अश्विन-अय्यरची अतूट भागीदारी, भारताचा बांगलादेशवर ३ विकेट्सने विजय; मालिकाही खिशात

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि आर अश्विन (R Ashwin) यांच्या समंजस फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशच्या जबड्यातून विजय हिसकावून (IND vs BAN) घेतला. मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमानांचा 3 विकेट्सने पराभव केला. यासह भारतीय संघाने 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आहे. याआधी भारताने चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला होता.

मीरपूरच्या शेर-ए बांगला नॅशनल स्टेडियमवर भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य होते. भारतीय संघाने चौथ्या दिवशी 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. श्रेयसने नाबाद २९ तर अश्विनने नाबाद ४२ धावा केल्या.

श्रेयस आणि अश्विनमध्ये 71 धावांची अतूट भागीदारी
भारतीय संघाने एका वेळी 74 धावांवर 7 विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर श्रेयस अय्यर आणि आर अश्विनने शानदार भागीदारी करत भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. दोघांनी नाबाद 71 धावांची भागीदारी केली, जी चौथ्या डावात भारतासाठी आठव्या विकेटसाठीची दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी लाला अमर सिंग आणि ला सिंग या जोडीने 1932 मध्ये इंग्लंडविरुद्ध 74 धावांची भागीदारी केली होती.

पहिल्या डावात भारताकडे 87 धावांची आघाडी होती
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या. माजी कर्णधार मोमिनुल हकने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या 93 धावांच्या जोरावर 314 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारताकडे 87 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात लिटन दासच्या 73 आणि सलामीवीर झाकीर हसनच्या 51 धावांच्या जोरावर यजमानांनी 231 धावा केल्या. भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य होते.