किरीट सोमय्या ‘मिस्टर इंडिया’ आहेत का? – महेश तपासे

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. यातच खासदार संजय राऊत (Sanjay Raut)आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यामध्ये देखील चांगलेच द्वंद्व सुरु आहे. मोडीत निघालेली आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचावी म्हणून जमा केलेल्या निधीवरून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर संजय राऊत हे आरोप करत असताना  न्यायालयाने सोमय्या यांना दणका दिला आहे.

आयएनएस विक्रांत बचावसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचा पिता- पुत्रांवर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयने फेटाळला आहे. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya)  यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर आता राष्ट्रवादीने सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  ज्या व्यक्तीला झेड सिक्युरिटी आहे ती व्यक्ती अचानक गायब कशी होते. किरीट सोमय्या ‘मिस्टर इंडिया’ आहेत का? गायब व्हायला असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर खोटेनाटे आरोप करून त्यांची बदनामी करणारे किरीट सोमय्या आज स्वतः नॉटरिचेबल आहेत हीच मोठी आश्चर्याची बाब आहे असेही महेश तपासे म्हणाले. किरीट सोमय्या गायब झाल्यामुळे त्यांनी निश्चितच युद्धनौका ‘विक्रांत’च्या नावाने गोळा केलेले पैशांची अफरातफर केली ही शंका आता जनतेच्या मनात घर करून गेली आहे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.