उद्धव ठाकरे यांना सुद्धा संजय राऊत चोर ठरवणार आहेत का? देवेंद्र फडणवीस यांचा थेट सवाल

Mumbai – विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना आणि भाजपवर (BJP) निशाणा साधताना केलं आहे. बनावट शिवसेनेने पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असंही संजय राऊत यांनी बोलताना ठणकावून सांगितलं आहे.

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, संपूर्ण विधानमंडळाला चोरमंडळ म्हणणे हे कुठल्याही स्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. असे प्रकार जर आपण सहन करणार असू, तर ते गंभीर ठरेल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत, मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का?

महाराष्ट्र विधानमंडळाची अतिशय थोर परंपरा आहे. देशातील सर्वोत्कृष्ट विधानमंडळ हे महाराष्ट्राचे आहे. हा विरोधी वा सत्ताधारी पक्षाचा प्रश्न नाही. हे सहन केले तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील. सर्वोच्च सभागृहाचा हा घोर अपमान आहे.असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, हा स्पष्ट संकेत देणे गरजेचे आहे. असं ते म्हणाले,

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करणार असून पुढील बुधवारी हक्कभंग प्रकरणावर निर्णय देणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे. तसेच, गोंधळामुळे सभागृहाची बैठक दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे.