मी हिजाबचं समर्थन करत नाही मात्र…; जावेद अख्तर यांची हिजाब वादावर प्रतिक्रिया

नवी दिल्ली : कर्नाटकात हिजाब आणि भगव्यांवरून वाद चिघळल्याने त्याचे पडसाद देशातील अनेक शहारांत पाहायला मिळत आहेत. पुण्यात देखील हिजाबच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. तर हिजाब वादाचे पडसाद मध्यप्रदेश मध्ये देखील पोहचले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जावेद अख्तर यांनी हिजाब आणि भगवा या वादांबद्दल ट्विट केलं आहे. यात ते म्हणाले की, मी हिजाबचं किंवा बुरख्याचं समर्थन करत नाही. मी माझ्या मतांवर ठाम आहे. परंतु मुलींना घाबरवणाऱ्या गुंडांची मी निंदा करतो. हे लोक त्या मुलींना कारण नसताना घाबरवण्याचा आणि धमकी देण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत. यामध्ये त्यांना मर्दानगी वाटते? मला या गोष्टीची दया येत आहे.

हिजाब वादांवर देशातील अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच राजकीय नेत्यांबरोबरच आता चित्रपट सृष्टीतील काही कलाकारांनी देखील या प्रकरणाबाबत मत व्यक्त केली आहेत. यामध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर, रिचा चड्ढा आणि अभिनेता कमल हासन यांनी देखील पोस्ट शेअर केल्या आहेत.