राज्यात पोलीस भरतीत महाघोटाळा ! मुंबई पोलिसांनी असा केला घोटाळा उघड

औरंगाबाद : राज्यात आरोग्य, टीईटी आणि आता पोलीस भरतीत देखील घोटाळा झाल्याचे उघड झालं आहे. मुंबई येथील पोलीस भरतीत घोटाळ्याबाजांनी डमी उमेदवार उभं करून घोटाळा केल्याचं पोलिसांनी उघड केले आहे. तर या संदर्भात उमेदवारांकडून ३ लाख रूपये घेतल्याचं स्पष्ट झाले आहे.

मुंबई पोलीस दलात १ हजार ७६ जागांसाठी भरती करण्यात आली होती. त्या भरतीसाठी ६ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत उत्तीर्ण उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. मैदानी चाचणी घेता वेळी पोलिसांकडून व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलं होतं. त्यानंतर या व्हिडीओ रेकॉर्डिंगची पुन्हा तपासणी केल्यानंतर हा घोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे अजून एक घोटाळा उघड झाल्याने बाकीचे उमेदवार यामुळे निराश झाले आहेत. आता त्यांनी या घोटाळ्याबाजांना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पोलिसांनाकडे केली आहे.

शारीरिक क्षमता नसलेल्या उमेदवारांच्या जागी दुसऱ्याच उमेदवारांना मैदानात उभं करण्यात आलं होतं. या पोलीस भरती प्रकरणासंदर्भात आतापर्यंत ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर याप्रकरणातील अजूनही ८ जण फरार झाले आहेत. पोलीस भरती प्रकरणात घोटाळेबाजांकडून डमी उमेदवार म्हणून त्या उमेदवारांच्या सारख्याच उमेदवारांचा शोध घेत होते. त्यांचा रंग रूप, उंची यांचा विचार करून मैदानात डमी उमेदवार उभे करत होते. याचा पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केल्याने या दोन्हींमध्ये पोलिसांना चेहऱ्यांमध्ये फरक दिसून आला होता. त्यानंतर हा घोटाळा उघड करण्यात आला आहे.

पोलीस भरतीत अटक करण्यात आलेले उमेदवार औरंगाबाद बीड जिल्ह्यातील असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र पवार यांनी सांगितले आहे की, एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणासंदर्भात ८ जणांना अटक केली आहे. तर अजूनही ८ जण फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.