करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; पहिल्याच दिवशी केला धक्कादायक खुलासा

अहमदनगर – काही महिन्यांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करून चर्चेत राहिलेल्या करुणा मुंडे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा आज अहमदनगरमध्ये केली आहे.यावेळी शिवशक्ती सेना असं पक्षाचं नाव असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलंय.

अनेक पक्षांनी मला प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं होतं, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या सारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत” असा दावाही करुणा यांनी केला.

अहमदनगरमध्ये जानेवारी अखेरीस मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्या संदर्भातली आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली आहे.वेळ पडलीच तर परळी वैजनाथ मतदारसंघातून पती धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध निवडणूक लढवण्याचीही तयारी असल्याचे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणे, गोरगरीबांवरील अन्याय दूर करणे या उद्देशाने या पक्षाची स्थापना करण्यात येत आहे. गेल्या २५ वर्षांपासून आपण अनेक यातना सहन केल्या आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पक्षात सर्वसामान्य जनतेला स्थान असेल असं देखील त्यांनी सांगितले.