मला कधीच वाटले नव्हते की मला काँग्रेस सोडावी लागेल; पक्ष सोडताना काँग्रेस नेता झाला भावूक 

Kiran Kumar Reddy joins BJP : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला दक्षिण भारतात दुसरा मोठा झटका बसला आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री ए. के. अँटनी यांच्या मुलानंतर आता आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री राहिलेल्या किरण कुमार रेड्डी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

पक्षात प्रवेश घेतल्यानंतर लगेचच भाजपच्या मुख्यालयात पत्रकारांना संबोधित करताना किरण म्हणाले, काँग्रेस लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि हायकमांडच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाचे राज्या-राज्यात विभाजन होत आहे. ही एका राज्याची बाब नाही, जवळपास सर्वच राज्यांची स्थिती तशीच आहे.

किरण कुमार रेड्डी म्हणाले, “मला कधीच वाटले नव्हते की मला काँग्रेस सोडावी लागेल. माझा राजा फार शहाणा आहे अशी एक म्हण आहे. तो कधीही स्वतःचा विचार करत नाही किंवा कोणाचा सल्ला ऐकत नाही. मला काय म्हणायचे आहे ते तुम्हा सर्वांना कळले असेलच.ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला लोकांचे मत समजू शकलेले नाही. चूक काय आहे याचे पक्ष विश्‍लेषण करत नाही आणि दुरुस्त करू इच्छित नाही. तो बरोबर आहे आणि देशातील लोकांसह इतर सर्वजण चुकीचे आहेत असे त्याला वाटते. याच विचारसरणीमुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.