किशोर आवारेंना गोळीबार अन् कोयत्याने वार करुन संपवलं; पुण्यात खळबळ

पुणे- मावळ तालुक्यातील उद्योगपती व तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे (Kishore Aware) यांच्यावर आज भरदुपारी तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात गोळीबार तसेच कोयत्याने वार केला गेला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारींची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांपैकी दोघांनी गोळीबार तर दोघांनी कोयत्याने वार केल्याने किशोर आवारे रक्तबंबाळ झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.