चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा; सीबीआय कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली-  चारा घोटाळा प्रकरणात आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय कोर्टाने लालू प्रसाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली असून लालू यादव यांना 60 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 15 फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यांच्यासह 38 अन्य आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. लालू यादव यांच्यावर सध्या रांचीच्या रिम्समध्ये उपचार सुरू आहेत.

विशेष सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना आयपीसीच्या कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, कट रचण्याशी संबंधित कलम १२०बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत दोषी ठरवले आहे. या प्रकरणात सीबीआयने एकूण 170 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर 26 सप्टेंबर 2005 रोजी 148 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते.

चार वेगवेगळ्या चारा घोटाळ्यात १४ वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह ९९ जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २९ जानेवारी रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.1990-95 दरम्यान डोरंडा ट्रेझरीमधून 139.35 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी लालू यादव यांना ही शिक्षा झाली आहे.
1996 मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात 170 जणांना आरोपी करण्यात आले होते.ज्यामध्ये ५५ आरोपींचा मृत्यू झाला असून सात आरोपी सरकारी साक्षीदार झाले आहेत. त्याचवेळी दोन आरोपींनी गुन्हा मान्य केला आहे. या पाचव्या प्रकरणापूर्वी लालू यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा झाली आहे.