देशभरात एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल – पवार 

 मुंबई – राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या नव्या तरतुदींमुळे देशभरात एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल, असं अजिच पवार यांनी जाहीर केलं आहे.

“राज्यात राबवण्यात येणाऱ्या विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमासाठी ४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर राज्यातली गुंतवणूक वाढेल आणि एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल”, असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी कृषी संदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये एक महत्त्वाची घोषणा म्हणजे भुविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांकडे असणारे 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तसेच भूविकास बँकांच्या जमिनींचा, इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.