शिवसेनेत जी बंडाळी झाली त्याला खतपाणी भाजपने घातले – राष्ट्रवादी

मुंबई – शिवसेनेत बंड घडवून महाविकास आघाडी सरकार (MVA) पाडण्याचे पाप भाजपने (BJP) केले हे महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, व पदाधिकारी कधीच विसरणार नाही हे सांगतानाच आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी राहणार असल्याचा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दिला आहे.

आज शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी भेट घेतली. त्यानंतर या भेटीबाबत महेश तपासे यांनी माहिती देताना भाजपला हे उघड आव्हान दिले आहे. भाजपची सत्ता येताच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करताना पहायला मिळेल असा विश्वासही महेश तपासे यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत असल्याने त्यांनी आज पवार यांची भेट घेतली. या भेटीत पवार यांनी मविआ सरकार पाडण्यासाठी झालेल्या घडामोडी आणि येत्या काळात कशापद्धतीने भाजप विरोधात लढा द्यायचा याचे सविस्तर मार्गदर्शन केले. अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारला पवारसाहेबांनी योग्य मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pwar)  यांनी निधीचे वाटप समान करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली असेही महेश तपासे म्हणाले.

शिवसेनेत जी बंडाळी झाली त्याला खतपाणी भाजपने घातले हे सर्व महाराष्ट्र पहात आहे. आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या शिलेदारांसह पुन्हा मैदानात उतरली असून येणाऱ्या निवडणुकीत भाजपविरोधात मविआचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी बांधला असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले.