राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड, १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरांवर अंमलबजावणी संचालयाने अर्थातच ईडीने (ED raid On Hasan Mushrif Home) धाड टाकली आहे. आज सकाळी हसन मुश्रीफ (NCP Leader Hasan Mushrif)यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीने छापा टाकला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केला होता. याच प्रकरणी ही कारवाई केली गेली असल्याचे समजत आहे.

ईडीचे पथक सकाळी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. सकाळपासून पथकाने मुश्रीफ यांच्या घराची तपासणी सुरु केली आहे. तसेच, घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईडीचे जवळपास २० अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे समजते. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासह त्यांच्या कार्यालयांचीही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. हडपसर मधील अॅमनोरा आणि कोंढव्यात इडीची छापेमारी सुरू आहे.

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे नाव आहे. याशिवाय, ते शरद पवार यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आजच्या धाडसत्रानंतर ईडीने हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची कारवाई केल्यास तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धक्का ठरेल.