मोहम्मद शमीला कोर्टाकडून झटका; पत्नीला दर महिन्याला द्यावी लागणार ‘इतक्या’ लाखांची पोटगी

कोलकाता- भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याची पूर्व पत्नी हसीन जहाँ (Mohammed Shami Wife) यांच्यात सर्वकाही अलबेल नाही. सातत्याने हसीन जहाँ (Hasin Jahan) मोहम्मद शमीवर निशाणा साधताना दिसते. आता हसीन जहाँमुळे पुन्हा एकदा मोहम्मद शमीपुढील अडचणी वाढल्या आहेत. हसीन जहाँने ५ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर आता कोलकाताच्या अलीपूर कोर्टाकडून निर्णय देण्यात आला आहे. कोर्टाने शमीला १ लाख ३० हजार पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

हसीन जहाँ मागील काही वर्षांपासून शमीपासून वेगळे राहाते. २०१८मध्ये हसीन जहाँने १० लाख रुपये मासिक पोटगीची मागणी करणारी कायदेशीर याचिका दाखल केली होती. हसीन जहाँने याचिकेत म्हटले होते की, तिला वैयक्तिक खर्चासाठी ७ लाख रुपये आणि मुलीच्या संगोपनासाठी दरमहा ३ लाख रुपये पोटगी हवी आहे. मात्र आता अलीपूर कोर्टाच्या जज अनिंदिता गांगुली यांनी तिच्या याचिकेवर निर्णय दिला आहे.

कोर्टाच्या आदेशानुसार शमीला हसीन जहाँला ५० हजार रुपये मासिक पोटगी द्यावी लागणार आहे. तर मुलीच्या खर्चासाठी दर महिन्याला ८० हजार द्यावे लागणार आहे. असे असले तरीही हसीन जहाँ या निर्णयावर असंतुष्ट आहे. ती आता या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करू शकते.

दरम्यान २०१८मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या वैयक्तिक आयुष्यात भूकंप आला होता. शमीची पत्नी हसीन जहाँने या दिग्गज गोलंदाजावर घरगुती हिंसाचार, मॅच फिक्सिंग, हुंडाबळी असे गंभीर आरोप केले होते. यानंतर मोहम्मद शमीने पत्नीच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. नंतर शमी आणि हसीन जहाँ वेगळे झाले. आता हसीन जहाँ तिच्या मुलीसह वेगळे राहाते.