आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची हकालपट्टी करा; सटाणा येथे मविआचे आंदोलन 

सटाणा  – शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री असलेले तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांनर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य(Controversial statement) केले आहे. सत्तांतर झाल की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. असं वादग्रस्त वक्तव्य उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे. उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत असंही ते म्हणाले. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केले आहे.

दरम्यान, तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी तत्काळ मराठा समाजाची माफी मागावी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सावंत यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा देत सावंत यांच्याविरोधात बागलाण तालुका महाविकास आघाडीतर्फे मंगळवारी येथील तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

माजी आमदार संजय चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजेंद्र चव्हाण, जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करीत बागलाण तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.