पुण्यातील मनसेच्या महाआरतीची नॅशनल मीडियानेही घेतली दखल 

पुणे :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.हिंदुत्वाची कास धरत राज यांनी मशिदींवरील भोंग्यावरून जोरदार हल्ला चढवला.गुढीपाडव्याच्या उत्तरसभेत तर राज यांनी मविआ सरकारला भोंगे काढून टाकण्याविषयी ३ मे पर्यंत मुदत देऊन आव्हानच दिले आहे.

याच धर्तीवर हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे पुण्यात आले होते.येथील खालकर चौकातील हनुमान मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते आज साडे सातच्या सुमारास महाआरती पार पडली.यावेळी मनसेकडून दुपारपासूनच मंदिर परिसरात ढोल-ताश्यांचा गजर चालू होता.याच गजरात राज यांचे भव्य स्वागत केले गेले.महाआरती झाल्यानंतर हनुमान चालिसा पठण देखील झाले.यावेळी हनुमान चालिसा छापलेल्या लहान पुस्तिकांचे जनसमुदायला वाटपही केले गेले.दरम्यान,  पुण्यातील मनसेच्या महाआरतीची नॅशनल मीडियानेही दखल  घेतली. अनेक हिंदी तसेच इंग्लिश माध्यमांनी राज ठाकरे ही आरती लाईव्ह दाखवली.  खालकर चौकात राज ठाकरे यांचे हिंदुजननायक असे लिहिलेले फलकही लावण्यात आले होते.यावेळी मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती तसेच रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झालेला देखील दिसून आला.

दरम्यान राज यांच्या कृतीचे इतर पक्षांकडूनही अनुकरण झालेले दिसून आले.शिवसेनेकडूनही दादरच्या गोल मंदिरात आरती आणि हनुमान चालिसा पठण आयोजित केले होते.यावेळी मुस्लिम बांधव देखील उपस्थित होते.तर पुण्यातच राष्ट्रवादी पक्ष आणि साखळीपीर मारुती मंदिर यांच्याकडून मुस्लिमांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते.