भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेतृत्वाचा अपमान; नाना पटोलेंची खेळी यशस्वी ठरली

राम कुलकर्णी –  महाराष्ट्रात महाविकास आघाडी आता नावालाच उरली आहे. कारण, भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेतृत्वाचा अपमान झाला असून एका अर्थाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची खेळी यशस्वी ठरली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा 14 दिवसांचा महाराष्ट्रातला प्रवास काल संपला. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, बुलढाणा, जळगाव आदी जिल्ह्यातून यात्रेचा प्रवास झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सोबत असुन राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष सोबत आहेत. यात्रेत सहयोगी पक्षाच्या नेतृत्वाने सहभागी व्हावे अशी पुर्वरचना काँग्रेसकडून करण्यात आली. त्यानुसार सुप्रियाताई सुळे, रोहित पवार, आदित्य ठाकरे, एकनाथ खडसे, राजेश टोपे आदी मंडळी यात्रे दरम्यान पायपीट करण्यात सहभागी झाली.

शेगाव तथा अन्य मुख्यालय ठिकाणी राहुल गांधींच्या जाहिर सभा झाल्या. यातून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी निश्चित म्हणावी लागेल. संयोजक अर्थात प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांना जाहिर सभेत बोलण्याची संधी दिली नाही. शेगावात एकनाथ खडसे सारखे जेष्ठ नेते असताना त्यांनाही बोलू दिलं नाही. राजकियदृष्ट्या हा काँग्रेसनं सहकारी पक्षाचा केलेला अपमानच म्हणावा लागेल. आ.नानाभाऊ पटोले आणि राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वात धुसफुस नेहमीच चालते. त्याचाच एक भाग म्हणुन त्यांची जागा त्यांना दाखवुन देण्यात पटोले यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही.

पदयात्रेचा समारोप काल बुलढाणा जिल्ह्यात राहुल गांधींच्या जाहिर सभेने झाला. महाराष्ट्रात चौदा दिवसांचा प्रवास करताना यात्रा यशस्वी वाटत असली तरी त्यातुन राजकिय चमत्कार आणि घडामोडी निश्चित पहायला मिळाल्या. एक तर राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाहिर अपमान करून जनतेचा रोष ओढावून घेतला. एका भाषणात यात्रेचे चौदा दिवस गोदावरी पात्रात बुडाल्यासारखे निश्चित झाले म्हणावे लागतील. भलेही त्यांनी दुसर्‍या सभेत चुक सुधारून घेतली. पण राहुल गांधी यांच्या मनात सावरकरांविषयी असलेली घृणा अधुनमधुन सतत बाहेर पडत असते आणि त्यांच्याच जन्मभुमीत अर्थात महाराष्ट्रात येवुन सुद्धा म्हणे सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली. त्यानंतर गदारोळ उठला. हिंदु भक्त, राष्ट्र भक्त रस्त्यावर उतरले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाशिमच्या जाहिर सभेत भारताचं राष्ट्रगीत चालु करताना नेपाळचे लागलेले राष्ट्रगीत लोकांना सहन झाले नाही.खरं तर जाणिवपुर्वक खोडसाळपणाच म्हणावा लागेल. कारण, आपल्या देशात दुसर्‍या देशाचे राष्ट्रगीत लागण्याची चुक यापुर्वी कधीच झालेली नाही. यातुन राष्ट्रभक्ती आणि देशावर असलेले प्रेम किती नाटकं म्हणावे लागेल ? याची प्रचिती लोकांना आली. यात्रेदरम्यान वेगवेगळे प्रयोग राहुल गांधींनी निश्चित केले.

जिथे काँग्रेस बालेकिल्ला राज्यात आहे त्याच भागातुन भारत जोडो यात्रा अगदी रचना काढून निघाली. नांदेड किंवा विदर्भात काँग्रेस बालेकिल्ले म्हणुन ओळखल्या जाते. कदाचित पश्चिम महाराष्ट्रात यात्रा आली असती तर प्रतिसाद मिळाला नसता ? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने सहभागी व्हावं आणि महाविकास आघाडी किती भक्कम आहे ? हे दाखवण्यासाठी राज्यात यात्रा येण्याच्या अगोदर काँग्रेसच्या अनेक पुढार्‍यांनी विशेष प्रयत्न केले होते. शरदचंद्रजी पवार, उद्धवजी ठाकरे यांना भेटून यात्रेचे निमंत्रण दिले होते. पवार साहेबांनी कुठेतरी सहभागी व्हावे असा निखारीचा प्रयत्न झाला. पण यात्रेत कुठेही पवार – ठाकरेंनी सहभाग दाखवला नाही. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी दया, कुछ तो गडबड है यात शंका नाही. पवार साहेब आजारी असल्याचे कारण, समजून घेवू पण, उद्धव ठाकरेंनी देखील दुर राहणे पसंत केले. त्याचा अर्थ असा निघू शकतो भविष्यात काँग्रेसला बाजुला ठेवुन राजकारणात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येवू शकते.

पवार- ठाकरे सहभागी झाले नसले तरी त्यांनी आपले वारसदार आदित्य ठाकरे तथा रोहित पवारांना पाठवले. हे बिचारे लेकरे यात्रेत सहभागी झाले. राहुल गांधींच्या सोबत चालताना माध्यमांवर चमकले. काही काळ सुप्रियाताई देखील सहभागी झाल्या. गंमत बघा, सुप्रियाताई या तर पक्षाच्या जेष्ठ नेत्या म्हणुन त्यांच्याकडे पाहिल्या जाते. पण भारत जोडो यात्रेत या मंडळींना जाहीर भाषणात कुठेही संधी दिली नाही. किमान सुप्रियाताईंना एखादी संधी द्यायला हवी होती. पण, अगदी संयोजकांनी कट मारत त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. शेगावच्या जाहीर सभेसाठी राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे प्रवास करून जळगावहुन आले. बिचार्‍यांना तोंड उघडायला संधी दिली नाही. तिथे राजेश टोपे, फौजिया खान, अरूण गुजराथी, शिवसेनेचे काही प्रमुख नेते असताना एकालाही बोलण्याची संधी देण्यात आली नाही. प्रश्न असा पडतो चौदा दिवसांच्या भारत जोडो यात्रेत प्रदेश काँग्रेसने त्यांच्या अजिंड्याशिवाय इतरांना शिरकाव होवू दिला नाही. कशामुळे बोलु दिले नाही ?त्यापेक्षा निमंत्रण देवून बोलायला संधी न देणं म्हणजे जेवणाचं आमंत्रण द्यायचं, आणि पंक्तीला बसल्यास ताटात काही वाढायचं नाही असंच काही म्हणावे लागेल. यावर बारकाईने नजर टाकुन राजकिय संशोधन करण्याचा प्रयत्न केला तर यात्रेवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पुर्णत: कमांड होती.

खरं तर पटोले हे भाजप मधून आले त्या अगोदर बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, पृथ्विराज चव्हाण यांचे आयुष्य महाराष्ट्र काँग्रेस मध्ये गेले. पण, आपल्याच नेतृत्वाचा प्रभाव पटोलेंनी दाखवताना यात्रा आपल्या ताब्यात विशेषत: आपण सुचवेल तेच राहुल गांधी ऐकणार, राजकियदृष्ट्या हे गणित जुळवुन त्यांनी ठेवलं असावं. एव्हाना तसंच घडलं. राहुल गांधींच्या आसपास दुसर्‍यांना लक्ष्मणरेषा ओढुन ठेवल्यासारखी पटोलेंची भुमिका होती. एकट्या राहुल गांधींना बाजुला सोडलच नाही. त्यामुळे पटोले प्रभावित यात्रा मग कार्यक्रमाची रचना. त्यातूनच सहयोगी राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचा झालेला अपमान हे रहस्य आता चर्चेला येवु शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे हे राजकारण स्वत: शरदचंद्र पवार अनेक वर्षांपासुन ओळखुन आहेत. आपण सहभागी झालोत तर पायपीट करूनच परत यावे लागेल. राहुल गांधी बोलायला संधी देणार नाहीत. कदाचित हे सारं ओळखून शरदचंद्र पवारांनी यात्रेत सहभाग दाखवला नाही.

उद्धव ठाकरे मनाने काँग्रेस सोबत नाहीत. त्याहून अधिक बारामतीकरांच्या गळ्यात जास्त पडलेले आहेतच. स्वत:हून यात्रेत न जाण्याचा त्यांचा निर्णय अखेर ठाम राहिला. आक्षेप येवू नये म्हणुन लेकराला पाठवले. पण, अन्य शिवसैनिक कुणीही यात्रेत सहभागी झाला नाही. चौदा दिवसांची भारत जोडो यात्रा यशस्वी ठरली असे काँग्रेसजनांना निश्चित वाटत असेल. मोठ्या थाटामाटात विदर्भातून काल राहुल गांधीला यात्रेचा समारोप करून निरोप दिला असला तरी यात्रा दरम्यान पाण्याच्या लाटा पुलाखालुन निश्चित वाहुन गेल्या. ज्याचा राजकिय उद्रेक येणार्‍या काळात झालेला दिसेल. कदाचित निवडणुकीत एकटा काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडला तर नवल वाटणार नाही. कारण, भारत जोडो यात्रेत सहयोगी पक्षाच्या उदळलेल्या दांड्या आणि त्यांना दाखवून दिलेली त्यांची जागा राजकियदृष्ट्या हा फार मोठा अपमान म्हणावा लागेल आणि या सर्व घडामोडीत प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या राजकिय खेळी यशस्वी झाल्या. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी. स्वपक्षातील अनेकांना यात्रेपासून दुर ठेवण्यात ते यशस्वी तर झालेच पण,खा.शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे यांचाही राजकीय पाय पुढे पडू दिला नाही .