रामदास आठवलेंचा राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का; मातब्बर नेत्याचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष रतनभाऊ श्रीधर कदम (Ratanbhau Kadam) यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawle) यांची मुंबईत बांद्रा येथील कार्यालयात भेट घेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात आज जाहीर प्रवेश केला.

रतन कदम हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत. मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु झालेल्या अंतर्गत कलह आणि शरद पवार विरुध्द अजित पवार असे गट पडल्यामुळे रतन कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करुन रतनभाऊ कदम यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. रतनभाऊ कदम यांना कोकणातील राजकीय, सामाजिक घडामोडींचा चांगला अनुभव आणि अभ्यास असुन त्यांना आंबेडकरी चळवळीत काम केल्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आशिर्वाद घेवुन रतन कदम यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव रमाकांत जाधव आणि अनेक कार्यकर्त्यांनी रतनभाऊ कदम यांचे रिपब्लिकन पक्षात स्वागत केले आहे.