खडसेंना चंद्रकांत पाटलांचा धोबीपछाड; राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षाला राम राम 

जळगाव – गेल्या काही दिवसांपासून जळगावात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. यातच आता  राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पुन्हा जळगावातील मुक्ताईनगरच्या (Muktainagar Jalgaon) स्थानिक आमदाराने धोबीपछाड दिला आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या तरुण शेकडो युवकांनी स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले.

याआधी बोदवड नगरपंचायतीमध्ये एकनाथ खडसे यांना चंद्रकांत पाटील यांनी हादरा दिला होता. त्यापाठोपाठ हा खडसेंना दुसरा धक्का मानला जात आहे. एकीकडे महाविकास आघाडी भक्कम असल्याचे दाखवले जात असताना दुसऱ्या बाजूला या आघाडीतील पक्ष एकमेकांवर अशा पद्धतीने कुरघोड्या करत असल्याने खरंच ही आघाडी भक्कम राहिल का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.