पुढची निवडणूक मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल अशी असेल – सिसोदिया

नवी दिल्ली – दिल्लीच्या मद्य धोरणाबाबत सीबीआयच्या (CBI) तपासामुळे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Deputy CM Manish Sisodia) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान सीबीआय त्यांना तीन-चार दिवसांत अटक करेल, अशी भीती सिसोदिया यांनी व्यक्त केली.

सिसोदिया म्हणाले, ‘आम्ही भगतसिंग यांचे अनुयायी आहोत. आम्ही स्वतःला भगतसिंगांची मुले समजतो. आम्ही तुमच्या (भाजप) सीबीआय, ईडीला (ED) घाबरत नाही, आम्ही देशासाठी प्राणाची आहुती देऊ, देशासाठी तुरुंगातही जाऊ, पण लाखो मुलांचे भविष्य घडवणे आम्ही थांबवणार नाही, करोडो लोकांच्या उपचारासाठी आम्ही काम करणे थांबवणार नाही.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, आज लाखो आणि करोडो मुलांच्या प्रार्थना आमच्या आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पाठीशी आहेत. आम्ही तुम्हाला (भाजप) घाबरणार नाही. उपमुख्यमंत्री म्हणाले की, पुढची निवडणूक मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल अशी असेल.

मनीष सिसोदिया म्हणाले की त्यांचा मुद्दा दारू/अबकारी घोटाळा नाही. त्यांची अडचण अरविंद केजरीवाल आहे. माझ्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले.त्यांना अरविंद केजरीवाल यांना कसे रोखायचे. सिसोदिया म्हणाले की, मी कोणताही भ्रष्टाचार (Corruption) केलेला नाही. मी फक्त अरविंद केजरीवाल यांचा शिक्षणमंत्री आहे.