नितीन देसाईंच्या डोक्यावर होता भल्यामोठ्या कर्जाचा बोझा, आकडा ऐकूून फिरतील डोळे!

Nitin Desai Suicide : आज सिने जगतामधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.  सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये वयाच्या केवळ ५८ व्या वर्षी गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे.

नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली? याचा शोध पोलीस घेत आहेत. तत्पूर्वी प्राथमिक चौकशीत नितीन देसाई आर्थिक संकटात अडकले होते अशी माहिती समोर आली आहे. पीटीआय रिपोर्टनुसार, नितीन देसाई यांच्यावर २५२ कोटी रुपयांचे कर्जाचा बोझा होता. देसाई यांच्या कंपनीला मागील आठवड्यात न्यायालयाने डिफॉल्टर मान्य केले होते. नितीन देसाईंच्या ND’s Arts World PVT LTD ने २०१६ आणि २०१८ मध्ये ECL फायनान्सकडून सुमारे १८५ कोटींची २ कर्ज घेतली होती. जानेवारी २०२० पासून त्यांच्यामागे कर्ज परतफेडीचा ससेमिरा सुरू झाला होता.

NCTL नं पारित केलेल्या आदेशानुसार, ३० जून २०२२ रोजी नितीन देसाई यांच्या कंपनीवर २५२.४८ कोटींचे कर्ज थकबाकी होती. ७ मे २०२१ रोजी नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओला आग लागली होती. त्यात प्रचंड नुकसान झाले होते. त्यातच कर्ज पुरवठादारांनीही नितीन देसाईंना कर्जाच्या वसुलीबाबत नोटीस पाठवली होती. इतकेच नाही तर गेल्या काही महिन्यांपासून ND स्टुडिओचा ताबा मिळवण्यासाठी कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी हालचाल केली होती अशी माहिती समोर आली आहे.