अवघ्या 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन’, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

मुंबई – राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र हे अधिवेशन कमी काळाचं असल्याचं विरोधकांनी टीका केली आहे. आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 4 ते 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन होणार आहे. पहिला दिवस पुरवणी मागण्यांचा असणार आहे. आमची मागणी होती की अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. संसदीय कामकाजात ठाकरे सरकारला रस नाही, अधिवेशन टाळण्याचे प्रयत्न ठाकरे सरकारकडून होतो आहे हे स्पष्ट आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अतिशय गंभीर बाब म्हणजे तारांकित, अतारांकित प्रश्नांना गेल्या दोन वर्षात सरकारकडून कोणतीच उत्तरे देण्यात आलेली नाही. एकीकडे अधिवेशन घ्यायचे नाही आणि दुसरीकडे प्रश्नांना उत्तरे सुद्धा द्यायची नाहीत. आता ती उत्तर देण्याचे आता मान्य केले आहे अशी टीका त्यांनी केली.

या अधिवेशनात तरी किमान रोज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी घेण्याची मागणी आम्ही केली होती. आता ती घेण्याचा निर्णय झाला आहे. सलग दोन अधिवेशन नागपूरला झालेले नाही. त्यामुळे विदर्भात प्रचंड रोष आहे. सद्या मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने ते मुंबईत घ्यावे लागते आहे. पण मार्च अधिवेशन नागपूरला घ्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. त्यावर निर्णय घेण्याचे मान्य केले आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली.