लोकाभिमुख सरकार येत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहिल – फडणवीस 

मुंबई – अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल (Legislative Council Election Results) समोर आला असून भाजपने (BJP) आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला असून महाविकास आघाडीसाठी (MVA) हा मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा दिला आहे. कॉंग्रेससह महाविकास आघाडीने पूर्ण ताकत लावून सुद्धा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अचूक नियोजनामुळे हंडोरे यांना विजय मिळवता आला नाही. भाजपच्या प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मिळवलेला विजय भाजपसाठी आत्मविश्वास वाढवणारा तर महाविकास आघाडीसाठी आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडणारा आहे.

दरम्यान, या विजयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत त्याचा मला खूप आनंद झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मतं घेतली होती. आता आम्ही १३४ मतं घेतली आहेत. मी आधीपासून हे सांगत होतो महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. आपल्या विवेकबुद्धीला अनुसरून आमदार मतं देतील. तेच पाहण्यास मिळालं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आमचे पाचही उमेदवार सर्वाधिक मतं मिळवून निवडून आले आहेत. देशात मोदींची लाट आहे आणि महाराष्ट्रही मोदींच्या मागे उभा आहे हेच या निकालांनी दाखवून दिलं आहे. लोकाभिमुख सरकार (People-oriented government) देणं हा आमचा मानस आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपकडे पाचवा उमेदवार जिंकण्यासाठी पुरेशी मतंही नव्हती तरीही आमच्यावर जो विश्वास आमदारांनी दाखवला त्यांचे आम्ही आभार मानतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.