पिंपरी – चिंचवडकर जनतेच्या वतीने संभाजीराजे यांना आमचा पाठिंबा – महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड – मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर राज्य शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. ठाकरे सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात आता असंतोष वाढू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत.  खरतर मराठा समाजाच्या मागण्या 15 दिवसात मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही यामुळे एकंदरीतच  सरकारने शब्द पाळला नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आता भाजप संभाजीराजे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे दिसत आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी संभाजीराजे यांना पाठींबा दर्शविला आहे. ते म्हणाले,  मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी युवराज संभाजीराजे छत्रपती हे आझाद मैदान , मुंबई येथे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. मराठा आरक्षण व समाजाच्या इतर न्याय हक्कांसाठी म्हणून तसेच संबंध पिंपरी – चिंचवडकर जनतेच्या वतीने संभाजीराजे यांना आमचा पाठिंबा आहे. लवकरच हा प्रश्न निकाली लागावा अशी आम्हा सर्वांची अपेक्षा आहे .