आरोग्य विभागाच्या पेपर फुटीचे औरंगाबाद केंद्र..! आणखी तिघांना पुणे पोलीसांकडून अटक

औरंगाबाद – राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने वेगेवळ्या शहरात छापेमारी करत आणखी तिघांना अटक केली आहे.

दरम्यान, पेपर फुटीचे केंद्र औरंगाबाद शहर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एका विद्यार्थ्याकडून त्यासाठी ५ लाख रुपये घेतल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

अनिल दगडू गायकवाड (वय ३१), बबन बाजीराव मुंडे (वय ४८, रा. जालना) आणि सुरेश जगताप (वय २८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यापुर्वी विजय प्रल्हाद मुराडे (वय २९) याला अटक केलेली आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.