पोलिसांनी सोनाली फोगटच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली, राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली

पणजी – भाजप नेत्या (BJP), टिकटॉक स्टार आणि बिग बॉसची स्पर्धक सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे निधन झाले आहे. सोनाली फोगट (42) हिचा मंगळवारी सकाळी गोव्यातील अंजुना (Anjuna) गावात मृत्यू झाला. आता ताज्या माहितीनुसार, अंजुना पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची (Unnatural death) नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला असून, बुधवारी शवविच्छेदन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिस महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंह (Jaspal Singh) यांनी TOI ला सांगितले- सोनाली फोगट अंजुना, कर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. येथे तिने अस्वस्थतेची तक्रार केली होती आणि त्यानंतर ती हॉटेलमध्ये आली होती. प्राथमिक तपासात आम्हाला काहीही चुकीचे आढळले नाही. विशेष म्हणजे तिच्या मृत्यूच्या काही तास आधी सोनाली फोगितने इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. ज्यामध्ये ती गुलाबी दुपट्ट्यात खूप खुश दिसत होती.

राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय तथ्य शोध पथकाची स्थापना केली आहे. दरम्यान, सोनाली फोगटने तिच्या मृत्यूच्या काही तास आधी तिच्या आईशी बोलल्याचा दावा त्यांची बहीण सुदेश देवी (Sudesh Devi) यांनी केला आहे. सोनालीने सांगितले होते की, तिच्या जेवणात काहीतरी मिसळले जात आहे, ज्याचा तिच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सोनालीने तिच्या आईला सांगितले होते की, ‘माझ्याविरुद्ध काही षडयंत्र रचले जात आहे.’