सेना-राष्ट्रवादीने केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम, मुंबै बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून मुंबई जिल्हा बँकेवरचे प्रवीण दरेकरांचे वर्चस्व आता संपुष्टात आलं आहे. कारण मुंबै जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. आता मुंबै बँकेच्या अध्यक्षपदावरुन प्रवीण दरेकर यांना पायउतार व्हावं लागणार आहे.

मुंबै बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी दरेकर यांना अध्यक्षपदावरुन बाजूला केलं आहे. तर मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी विजय मिळवला आहे.

मुंबै जिल्हा बँक अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे विजयी झाले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रसाद लाड पराभूत झाले आहेत. ११ विरूद्ध ९ मतांनी विजयी झाले आहेत. उपाध्यक्ष पदामध्ये टाय झालं होतं. यानंतर ईश्वर चिठ्ठीने याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उपाध्यक्ष पद विठ्ठल भोसले यांच्याकडे गेलं आहे. थोडक्यात अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि उपाध्यक्षपद भाजपकडे गेलं आहे. एक वर्षांनंतर मुंबै बँक अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी आज सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी मिळून मुंबई बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परिवर्तन करण्याची रणनिती आखली. त्यानुसार अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची उमेदवार जाहीर करण्यात आली.