महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘नारळ’? चौथ्या टप्प्यात बदली होणार असल्याची चर्चा 

पिंपरी । राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. शुक्रवारी १२ बड्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. तत्पूर्वी दोन टप्प्यांमध्ये प्रशाकीय खांदेपालट करण्यात आली होती. आता चौथ्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचीही बदली होणार  असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,  लोकसभा निवडणुका मुक्त आणि मोकळ्या तसेच पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणुक प्रक्रियेशी सबंधित महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार एकाच पदावर तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या किंवा गृह जिल्हा असलेल्या पोलीस दलातील आयुक्त, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपायुक्त आदी तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार अशा महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून केल्या आहेत. हा नियम आता महापालिका आयुक्तांनाही लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची बदली निश्चित मानली जाते.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचीही मुदतपूर्व बदली होणार, असे बोलले जात होते. मात्र, आयुक्त सिंग आणि राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार अण्णा बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची मध्यंतरी भेट घेतली. त्यामुळे आयुक्त आणि सत्ताधारी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये ‘मनोमिलन’ झाले, अशी चर्चा आहे. परंतु, आयुक्त सिंग आणि शिवसेना व भाजपाच्या स्थानिक नेत्यांमधील समन्वय बिघडला असून, आयुक्त आमदार-खासदारांनी पाठपुरावा केलेल्या विविध विकासकामांमध्ये जाणीवपूर्वक हयगय करीत आहेत. तशी तक्रार भाजपा-सेना खासदार व आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  केल्याचे सांगितले जात आहे.

भाजपाचे माजी संघटक अमोल थोरात यांनीही आयुक्त सिंग यांच्या कारभाराविरोधात रान पेटवल्याचे सर्वश्रूत आहे. भाजपा निष्ठावंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात थोरात यांचा प्रभाव आहे. वाकड टीडीआर कथित घोटाळा आणि आयुक्त भवनमधील पूजाविधीच्या मुद्यावरुन थोरात यांनी व्यंगचित्र काढून आयुक्त सिंह यांची बदली करा अशी मागणी पक्षश्रेष्ठी आणि थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच, भाजपा आणि शिवसेना स्थानिक, आमदार खासदारांनी आयुक्त सिंग यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार केली आहे. आमदार, खासदारांनी सुचवलेली विकास कामे करण्यासाठी दिरंगाई, टाळाटाळ  आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना ‘रेड कार्पेट’ अशी भूमिका घेतल्यामुळे आयुक्त सिंह रडारवर आहेत.

दरम्यान, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नावाबाबत चर्चा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यातील किन्हई येथील रहिवाशी असलेले आणि सातारा येथील सैनिक स्कुलचे माजी विद्यार्थी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि नवी मुंबई अशा ठिकाणी सेवा बजावली आहे. राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सेनेतील बड्या नेत्यासोबत भोसले यांचा सलोखा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपा-सेनेच्या स्थानिक नेत्यांनी डॉ. भोसले यांची पिंपरी-चिंचवडमध्ये आयुक्तपदी नियुक्ती करण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे आणि आमदार अश्विनी जगताप यांच्यात एकमत झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आयुक्त सिंग आणि त्यांची बदली… या बाबत महापालिका व राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.