आज पुणे बंदची हाक, शहरात शुकशुकाट; पोलिसांचा कडक बंदोबस्त

Pune: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून पेटलेला वाद वाढतच चालला आहे. अजूनही राज्यपालांनी आपल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल क्षमा मागितलेली नाही. आता या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), आम आदमी पार्टी आणि इतर अनेक सामाजिक संघटनांनी बंद पुकारला आहे. आज संपूर्ण पुणे शहर बंद (Pune Band) राहणार आहे.

पुण्यात काय बंद आणि काय चालू?
दूध, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या किरकोळ दुकानांच्या संघटनेने सांगितले आहे की, ही दुकाने सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहतील. कपड्यांसारख्या अनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहतील. खबरदारीचा उपाय म्हणून कोठारी नॅशनल स्कूल, कोंढवा, द ऑर्बिस स्कूल, मुंढवा, क्लारा ग्लोबल, लेक्सिकॉन स्कूल या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक विक्रेते व कामगार संघटनांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. भाजीपाला, फळे आणि फुलांचे लोडिंग आणि अनलोडिंग बंद राहील. रिटेलर्स असोसिएशनचे प्रमुख सचिन निवांगुणे यांनी म्हटले आहे की, “आम्ही बंदला पाठिंबा देतो. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी उघडतील.”