पुणे महापालिकेचा 8,592 कोटींचा अर्थसंकल्प सादर; महत्त्वाच्या कामांना निधी

पुणे – पुणे महापालिकेचं 2022 -2023 या वर्षासाठीचं 8 हजार 592 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आयुक्त विक्रम कुमार यांनी आज स्थायी समितीला सादर केलं. यात 4 हजार 487 कोटी रुपयांचा महसुली खर्च आणि 3 हजार 710 कोटी रुपयांचा भांडवली खर्च प्रस्तावित केला आहे.

शहराचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जागतिक सल्लागाराकडून पुढील पाच वर्षाचा वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार असून त्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सहा नवीन उड्डाणपुलांच्या कामासाठी तसंच एका नदीवरील पुलासाठी आणि एका बोगद्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

पीएमपीएमएलसाठी 433 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नवीन ई बस खरेदी, चार्जिंग स्टेशन विकसित करणे, सार्वजनिक खासगी भागीदारीतून 30 बस डेपो उभारण्याचं यात प्रस्तावित आहे. पुण्यात नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. जायका प्रकल्प, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणि 24 तास पाणी योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून येत्या काळात ती गतीने पूर्ण करण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे.

घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी चार नवीन प्रकल्प उभारण्यात येणार असून कचऱ्यापासून वीज तयार करण्याचा प्रकल्प यंदा पूर्ण करण्यात येणार आहे; बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, महात्मा फुले मंडई आणि लाल महालाचा पुनर्विकास आदी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. आयुक्त विक्रमकमार यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे अंदाज पत्रक सुपूर्त केलं. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, आदी उपस्थित होते.