विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडी ठरणार किंगमेकर; अपक्ष आमदारांचेही महत्त्व वाढले

मुंबई – विधान परिषदेच्या ( Legislative Council) 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड (BJP’s Praveen Darekar, Ram Shinde, Shrikant Bharatiya, Uma Khapre and Prasad Lad), शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी (Shiv Sena’s Sachin Ahir and Amsha Padvi), राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे (NCP’s Ramraje Naik Nimbalkar and Eknath Khadse) तर काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे (Congress Bhai Jagtap and Chandrakant Handore) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान,  विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागलं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतील. त्यामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचेही महत्त्व वाढले आहे. यामुळेच बहुजन विकास आघाडीची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी सर्वच पक्षांची धडपड सुरु आहे. बविआकडे तीन आमदार असून निर्णायक ठरणार आहेत.

काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर देखील हितेंद्र ठाकूर यांची भेट घेणार आहेत. आतापर्यंत काँग्रेसचे भाई जगताप, भाजपच्या मनीषा चौधरी आणि राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी सर्वच पक्षांची हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरू आहे.