आधी स्वत:च्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…; रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील यांना झापलं

संभाजीनगर – औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे.  यावरून आता भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील यांना चांगलेच झापले आहे . औरंगजेब नाव एवढं चांगलं असेल, तर तुम्ही आपल्या मुलाचं नाव औरंगजेब का ठेवत नाहीत? असा सवालही दानवे यांनी विचारला.

ते म्हणाले, आधी आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग शहराला औरंगाबाद म्हणा, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. एमआयएमला माझा सवाल आहे की, तुम्हाला औरंगजेबबद्दल एवढं प्रेम का आहे? ज्यानं मराठवाड्यावर अन्याय केला, येथील लोकांना त्रास दिला, त्या औरंगजेबबद्दल तुम्हाला इतका पुळका येण्याचं कारण काय? सारा महाराष्ट्र जाणतो, औरंगजेब काय होता? दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेजण जाणतात.

संपूर्ण संभाजीनगरमध्ये मुस्लीम समाजातील एकाही मुलाचं नाव औरंगजेब नाही, असं मला स्वत:ला माहीत आहे. आधी आपल्या मुलांची नावं औरंगजेब ठेवायला सुरुवात करा, मग आमच्या गावाला औरंगाबाद म्हणा अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, आता या टीकेला जलील कसं उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.