‘सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संयम सुटला’

मुंबई – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली. यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या आहेत.

एसटीच्या विलीनीकरणात (ST workers) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.

या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलं आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी चिखलफेक होत असून या प्रकरणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ज्येष्ठ लोकनेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीत कोणत्याही नेत्याच्या घरावर हल्ला होऊ नये. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आहे.पण हल्ला करणे निषेधार्ह आहे. असं ते म्हणाले.