व्लादिमीर पुतीन यांची तिरकी चाल; युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता 

नवी दिल्ली- युक्रेनमधील डोनेत्सक आणि लुहांस्क या प्रांताना स्वतंत्र राष्ट्र म्हणून दर्जा देण्याबाबतच्या शासनादेशावर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. यासंदर्भातील घोषणा त्यांनी काल रात्री दूरचित्रवाणीवरुन संबोधनात केली. तत्पुर्वी त्यांनी फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्युएल मॅक्रॉन आणि जर्मन चांसलर ओलाफ शोल्झ यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि या निर्णयाबद्दल माहिती दिली.

दोन्ही नेत्यांनी पुतीन यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे असं क्रेमलिनने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. सीमाभागात सैन्याच्या हालचाली या नियमित लष्करी सरावासाठी आहे असां दावा रशियानं केला आहे. युक्रेन किंवा इतर कोणत्याही राष्ट्राला रशियन सैन्याकडून धोका नाही असंही रशियानं स्पष्ट केलं आहे.

फुटीरतावादी गटांना चालना दिल्यानं युक्रेनच्या सार्वभौमत्वाचं आणि अखंडतेचं उल्लंघन झालं असल्याची टीका ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी केली आहे. दरम्यान, संबंधित दोन प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्याचाही आदेश दिला आहे. हे सैन्य स्वतंत्र प्रांतांमध्ये शांतता राखेल असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वतंत्र प्रांत म्हणून घोषित केलेल्या रशियाच्या अधिपत्याखालील दोनही भागांवर अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन लवकरच निर्बंध जारी करणार आहेत अशी माहिती अमेरिकेच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी दिली. यामुळे डोनेस्क आणि लुहांस्क या भागात अमेरिकन नागरिकांना नव्यानं गुंतवणूक, व्यापार आणि अर्थपुरवठ्यावर बंधनं येतील असंही साकी यांनी सांगितलं. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनीं आपत्कालीन बैठक बोलावली आहे.