गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ काढणाऱ्यांची खैर नाही! महिला आयोगाने प्रकरणाची घेतली गंभीर दखल

पुणे- डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) बदनामीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील (Pune) एका स्टेजशो दरम्यान कपडे बदलताना गौतमीचे अश्लील चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस (police) स्टेशनला गौतमी कडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौतमीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.

या घटनेप्रकरणाची राज्य महिला आयोगाला देखील दखल घ्यावी लागली आहे. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत.

“लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील,” असं ट्वीट करून रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या.

“महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.