कमाल.. लाजवाब! सॅम करनने रचला इतिहास, ठरला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू

IPL Auction Live: इंडियन प्रीमियर लीग २०२३चा मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) आज (२३ डिसेंबर) केरळच्या कोची येथे सुरू आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता या लिलावाची सुरुवात झाली.

इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याला लिलावात विकत घेण्यासाठी जवळपास ५ संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. सॅम करन हा गोलंदाजी अष्टपैलू असून तो २ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. त्याला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स अशा भरपूर संघांनी रस दाखवला. अखेर पंजाब किंग्जने सर्वाधिक १८.५० कोटींची बोली लावत त्याला ताफ्यात सामील केले. या रेकॉर्डब्रेक बोलीसह सॅम करन आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

दरम्यान गतवर्षीची विजेती फ्रँचायझी गुजरात टायटन्सपासून (Gujrat Titans) आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सपर्यंत (Mumbai Indians) सर्व १० फ्रँचायझींचे संघमालक ऑक्शन टेबलवर बसून संघ मजबूत बनवताना दिसत आहेत. लिलावात एकूण ४०५ खेळाडू सहभागी झाले असून त्यांपैकी २७३ भारतीय, १३२ परदेशी आणि ४ खेळाडू असोसिएट देशांचे आहेत. आयपीएल फ्रँचायझी या ४०५ पैकी केवळ ८७ खेळाडूंना विकत घेतील. काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या पर्समध्ये सर्वाधिक ४२.२५ कोटी रुपये आहेत. तर शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स संघ सर्वात कमी ७.०५ कोटींसह लिलावात उतरला आहे.