समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी गेलेले चंद्रशेखर आझाद पडले तोंडघशी; माध्यमांसमोर व्यक्त केला संताप

लखनौ – भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी शनिवारी सांगितले की, पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा आझाद समाज पक्ष समाजवादी पक्षाशी (एसपी) युती करणार नसल्याची घोषणा केली आहे. चंद्रशेखर आझाद म्हणाले, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना दलितांचा पाठिंबा नको आहे.नोव्हेंबरमध्ये आझाद यांनी सांगितले की त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात यूपीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, जागावाटपावर चर्चा करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर आझाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, काल अखिलेशजींनी आमचा अपमान केला… काल अखिलेशजींनी बहुजन समाजाचा अपमान केला.आझाद पुढे म्हणाले, शेवटी, मला वाटले की अखिलेशजींना या आघाडीत दलित नेते नको होते… त्यांना फक्त दलित मते हवी होती.

आझाद म्हणाले,  आम्ही एकत्र निवडणुका लढवू, असे अखिलेशजींनी महिनाभरापूर्वी सांगितले होते. आमच्या संयुक्त लढ्याबाबत चर्चा करण्यासाठी मी दोन दिवसांसाठी येथे आलो आहे. भाजपला रोखण्यासाठी मला अखिलेशजींसोबत जायचे आहे. पण ते दलितांना प्रतिनिधित्वदेऊ इच्छित नाहीत. मी दोन दिवसांत माझ्या पुढील कृतीचा निर्णय घेईन… लवकरच तिसरी आघाडी तयार होऊ शकते.

चंद्रशेखर आझाद म्हणाले, मी इतर विरोधी पक्षांनाही योगींच्या विरोधात मला पाठिंबा देण्याचे आवाहन करेन… त्यांनी साडेचार वर्षांपासून जनतेला त्रास दिला आहे. आम्हाला बहुजन मतांचे विभाजन होऊ द्यायचे नाही म्हणून मायावतींच्या बहुजन समाज पक्षासोबत युती हवी आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान,आझाद आणि अखिलेश यांच्यात या निवडणुका एकत्र लढण्याचा व्यापक करार असल्याचे समजते, भीम आर्मी प्रमुख सहारनपूरमधील त्यांच्या गडावरून उभे राहण्याची शक्यता आहे.NDTV च्या वृत्तानुसार, अखिलेश यादव यांनी आझाद समाज पक्षाला तीन जागांची ऑफर दिली, परंतु चंद्रशेखर आझाद 10 जागांची मागणी करत होते.