मंत्र्यांचे अधिकार पुन्हा सचिवांना देणं म्हणजे संभाव्य मंत्र्यांच्या क्षमतेबाबतही शंका घेण्यासारखं आहे – पवार

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) (Shivsena) आणि भाजप (BJP) सरकारचा या आठवड्यात होणारा मंत्रिमंडळ विस्तार स्थगित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार टांगणीला लागल्याने आता मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मंत्र्यांअभावी अनेक विभागांच्या कामांवर परिणाम होत असून, त्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत.

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिंदे सरकारवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवार यांनी टि्वट करुन सरकारवर निशाणा साधला आहे. लोकशाही व्यवस्थेत लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी राज्य चालवत असतात. त्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण साहेब यांनी सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय केलं. पण ३७ दिवसांपासून आज तेच मंत्रालय मंत्र्यांविना ठप्प झालं असून फायलींचे ढिग साठले आणि लोकांची कामं खोळंबलीत, असं टि्वट पवार यांनी केलं आहे. तातडीने मंत्रिमंडळ विस्तार करुन कामकाजाला गती देण्याऐवजी राज्य सरकारने मंत्र्यांचे अधिकार पुन्हा सचिवांना देणं म्हणजे संभाव्य मंत्र्यांच्या क्षमतेबाबतही शंका घेण्यासारखं आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.