राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, असा घाणेरडा विचार घेऊन ते येऊच कसे शकतात?- संभाजीराजे

औरंगाबाद: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शिवाजी महाराज हे तर महाराष्ट्राचे जुने आदर्श असून नितीन गडकरी सध्याचे आदर्श आहेत, असे विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल  कोश्यारी बोलत होते.

त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी तर राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर हाकलण्याची मागणी केली आहे.

“राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असं मी परवा सुद्धा म्हटलं होतं. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात?,” असा सवाल माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी केला आहे.

याबरोबरच संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. “राज्यपाल महाराष्ट्रद्रोही आहेत, हे माहिती होते. परंतु ते शिवाजी द्रोहीदेखील आहे, हे आज माहिती पडले. छत्रपती शिवाजी महाराज कधीही जुने होणार नाहीत. ते नेहमी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या नसानसात जिवंत राहतील. राज्यपाल फक्त सकाळी झोपेतून उठतात आणि जीभ टाळूला मारतात. अशा वाचाळवीरांची जीभ बंद झाली पाहिजे,” अशा शब्दांत संतोष शिंदे यांनी राज्यपालांना सुनावले आहे.