समीर वानखेडे एक प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करत होता – नवाब मलिक

गोंदिया- शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे याने प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती हे भविष्यात सिध्द करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेलं त्यातूनच ड्रग्ज गेलं होतं ते सगळे पुरावे समोर आणणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

एनसीबीच्या डीजींकडे माझ्याकडे असलेले रितसर पुरावे पाठवणार आहे. इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल त्यांच्या कार्यालयातील आहेत. जागेवर जाऊन मुद्देमाल जप्त केला जात नाही. कार्यालयात आणून हे सर्व केलं जातंय. एका कोर्‍या कागदावर सह्या घेतल्या जात आहेत. समीर वानखेडे याने एक प्रायव्हेट आर्मी तयार केली असून त्यामध्ये प्लेचर पटेल, आदिल उस्मानी, के. पी. गोसावी, मनीष भानुशाली यासारखे अनेक लोक आहेत. हे सर्व घरात घुसून ड्रग्ज ठेवत आहेत आणि लोकांना अडकवत आहेत हे सगळं फर्जीवाडा असून याची संपूर्ण माहिती काढली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

कालच फर्निचरवाला नावाच्या मुलीने तिच्या बहिणीला कसं अडकवलं त्यावेळी प्लेचर पटेल उपस्थित होता हे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आणखी मोठा उलगडा होईल असेही नवाब मलिक म्हणाले.