‘संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे, खोदा पहाड निकला चूहा’

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट होतील अशी आशा तमाम मराठी जनतेला होती मात्र या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप पाहिल्यानंतर आता भाजप नेते राऊत यांची खिल्ली उडवू लागले आहेत.गेले काही दिवस फार मोठे काही तरी प्रकरण बाहेर काढणार असे वातावरण निर्माण करून शिवसेना खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली पण खोदा पहाड निकला चूहा असे झाले. असे नुसते आरोप करण्याने काही होत नाही. पुरावे असतील तर तपासी यंत्रणांना द्या आणि त्यांनी काम केले नाही तर न्यायालयात जा. असल्या पोकळ धमक्यांना कोणी घाबरत नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता पाटील बोलत होते. ते म्हणाले की, या पत्रकार परिषदेसाठी खूप वातावरणनिर्मिती केली, पण गर्जेल तो पडेल काय, असे झाले. एखादा माणूस अडचणीत आला की, थयथयाट करतो, तसा प्रकार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत दिसला असे पाटील यांनी म्हटले आहे.