पुण्यातील चांदणी चौक झाला भुलभुल्लैया… सत्यजीत तांबे यांनी वाहतूक कोंडीवर टाकला प्रकाश

Pune Chandani Chowk Traffic:- ‘आयटी हब’ (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ट्राफिकच्या (Pune Traffic) समस्येमुळे मागील काही वर्षांत बऱ्याच आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या होत्या. तरी देखील अजूनही शहरातील ट्रॅफिकचं चित्र तसंच असल्याचं दिसतंय. एनडीए म्हणजेच चांदणी चौकात मोठाले रस्ते आणि वळणावळणांमुळे कुठे व कसे जायचे, याबाबत प्रवासी संभ्रमात पडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पादचाऱ्यांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतुक नियंत्रण विभागाने याकडे लक्ष देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशा आशयाची माहिती देणारी व्हिडिओ पोस्ट आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी आपल्या सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून दिली आहे.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन तर झाले, मात्र परिस्थिती अजून बिकट झालेली दिसतेय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३९७ कोटी खर्च करून ८ रॅम्प, २ सर्व्हिस रोड, २ अंडरपास, ४ पूल असे १७ किलोमीटर रस्त्याचे काम केलेले आहे. मात्र या रस्त्यांवर काही ठिकाणी मार्गदर्शक फलक आहेत, तर काही ठिकाणी फलक लावलेले दिसत नाहीत. यामुळे वाहनचालकांना रस्ता समजत नाही आणि जेथे फलक लावले आहेत ते दिसत नाहीत. रस्ता चुकला की नागरिकांना दोन-दोन किलोमीटर फिरून यावं लागत आहे, असे आ. तांबे यांनी सांगितले.

नवीन रस्ते झाले असले तरी पादचाऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय, तसेच सर्व दिशांनी एकत्र येणाऱ्या अनेक रस्त्यांमुळे अपघाताची भीतीही वाढली आहे. त्यामुळे फक्त वाहतूक कोंडीच नाही, तर लोकांची मानसिक कोंडी देखील होतेय. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अवाढव्य खर्च करून नवीन रस्त्यांचा अट्टहास केला असला तरी समस्या काही सुटलेली दिसत नाही. हे सर्व बघता शहर विकासाला नियोजनाची जोड देणे, ही प्राथमिक गरज आहे हे स्पष्टपणे दिसतंय, असेही मत आ. सत्यजीत तांबे यांनी मांडले.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde