संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांची एसआयटी मार्फत होणार चौकशी

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची (Mumbai Police) एसआयटी (SIT) नेमून चौकशी करण्यात येईल असे सांगतानाच अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू (Veeresh Prabhu)यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल व त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil)यांनी आज माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज जनता दरबारसाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असता विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अलीकडच्या काळामध्ये भडकाऊ भाषणे करून समाजासमाजामध्ये तेढ व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. ही बाब राज्याच्या व देशाच्या एकतेच्या दृष्टीकोनातून बरोबर नाहीय यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

नाशिकच्या पोलिस आयुक्त पत्र प्रकरणावर बोलताना सदर गोष्ट त्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली पाहिजे असे सांगितले. विरोधकांच्या मंदिरांवरून स्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याच्या प्रकरणावरून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना पोलिस प्रशासन घेईल असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.