पवार घराण्यातील राजपुत्रावर आता थोरल्या साहेबांनी सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

जामखेड – आमदार रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनंतर प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी जबाबदारी सोपवली आहे. भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आता रोहित पवार यांच्या खांद्यावर असणार आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलेय की, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे.