ठाकरेंची शिवसेनाच पूर्णपणे हायजॅक करण्याचा शिंदेंचा प्लान; धनुष्यबाण या चिन्हावरच दावा ठोकणार ?

मुंबई  – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

उद्धव ठाकरे यांचं सरकार संकटात आल्यावर आता त्यांच्यावर चौफेर टीका होत असल्याचं दिसून येत आहे. इतकं मोठं बंड झाल्यावर त्यांनी सत्ता सोडायला हवी अशीही चर्चा सुरू आहे. ठाकरेंची शिवसेनाच पूर्णपणे हायजॅक करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याकडून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे आता शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच ते दावा ठोकणार असल्याचं बोललं जात आहे. असं झालं तर शिवसेनेनं संपूर्ण अस्तित्वच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडे फक्त 14 आमदार शिल्लक आहेत. सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे हे आम्हीच खरी शिवसेना आहोत. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उरलेली नाही, असं ठामपणे सांगत आले आहेत. आता हाच धागा पकडत त्यांनी थेट धनुष्यबाणावर दावा ठोकण्याची तयारी केली असून पुढील काही वेळात निवडणूक आयोगाकडे रितसर मागणीही केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.