संजय राऊत यांच्या मागे सोमय्या हात धुवून लागले; आज दिल्लीत जाऊन करणार ‘हे’ काम 

मुंबई –  महाराष्ट्रात नुकत्याच राज्यसभा निवडणुका (Rajya Sabha elections) संपल्या आहेत. या निवडणुकीत भाजपने (BJP) मोठा विजय मिळवला तर महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांना बराच संघर्ष करावा लागला. शिवसेनेच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या निवडणुकीत विजय मिळवला मात्र संजय पवार यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.  मात्र आता खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

माजी खासदार किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) राऊत यांची राज्यसभेवरील खासदारकी रद्द करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. मी आज दिल्लीला (Delhi) जाणार आहे. संजय राऊत यांच्या धमक्या देणार्‍या आमदारांची आणि भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांची उमेदवारीच रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला ( Election Commission) विनंती करणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलंय.

संजय राऊत यांनी सहा आमदारांची नावे उघड केली आणि त्यांनी आपला विश्वासघात केल्याचं म्हटलं. शिवसेनेला (Shivsena) दिलेल्या आश्वासनानुसार या मतं दिली नाहीत, असं राऊत म्हणाले. हे कायद्याच्या विरोधात असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. यासाठी कायदेशीर मार्गाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असं सोमय्यांनी स्पष्ट केलंय. यासाठी ते दिल्लीला रवाना होत आहेत. आता सोमय्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर यामध्ये आणखी काही बदल झाले तर राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.