राष्ट्रवादीच्या विरोधात काम करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते – Sunil Tatkare

Sunil Tatkare vs Pruthviraj Chavhan – सत्यशोधक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला वैचारिक दिशा मिळाली. विशेष म्हणजे स्त्रियांचा हक्क, शिक्षण यासंदर्भात रचलेला पाया गौरवास्पद व अभिमानास्पद आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महात्मा फुले यांना प्रदेश कार्यालयात आदरांजली वाहिली.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका वारंवार मांडली आहे. ते आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकले पाहिजे. दोन वेळा दिलेले आरक्षण उच्च व सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. यावेळी देताना ते कायद्याच्या कसोटीवर टिकले पाहिजे. मात्र आरक्षण देत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये यासंदर्भातील स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळात भुजबळसाहेबांसारखे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळाचे कामकाज पुर्ण ज्ञात आहे. ते स्पष्ट वक्ते आहेत त्यामुळे त्यांनी मंत्रीमंडळात भूमिका मांडली असेल. मात्र एखादं नेतृत्व जेव्हा वेगवेगळ्या कारणांनी समाजासमोर जात असतं त्यावेळी त्यांना ती भूमिका मांडावी लागतच असते. मंत्रीमंडळ आणि त्याविषयी असलेले विषय हा एक भाग झाला आणि मंत्रीमंडळाबाहेर जे काम असते त्यावर मोकळेपणे बोलण्याचा अधिकार त्यांना आहे असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

आम्हाला कुठे डावलले जाते यावर फार लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता संजय राऊत यांना नाही त्यांनी त्यांचा पक्ष कसा सावरायचा, लोकसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे यावर अधिक लक्ष केंद्रित केले तर बरं होईल असा सल्लाही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.

पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ राजकारणी आहेत असं मी इतके दिवस मानत होतो. परंतु अलीकडे त्यांना हा विनोद का सुचला हे माहीत नाही असा उपरोधिक टोला सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.

२०१४ मध्ये मी मंत्रीमंडळात होतो. राणे समिती नेमली गेली आणि मराठा समाजाला आरक्षण दिले गेले. मात्र ते उच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे २०१४ सत्ता गेल्यावर ते टिकले नाही किंवा राष्ट्रवादीमुळे टिकले नाही हे बोलण्यामागे त्यांचा हेतू काय आहे हे कळू शकले नाही. एक बाब नक्की आहे की २०१४ मध्ये कॉंग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसने मागितलेल्या जागांवर पहिले उमेदवार जाहीर केले. मी त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होतो. आम्हाला गाफील ठेवून कुठल्या जागा हव्यात याची माहिती काढून घेतली परंतु आतापर्यंतचा प्रघात आहे की निवडणूकपूर्व दोन राजकीय पक्षांची युती किंवा आघाडी होत असते त्यानंतर यादी घोषित करतात. परंतु पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते असा गौप्यस्फोटही सुनिल तटकरे यांनी करतानाच त्यामुळेच निवडणूक पूर्व युती होऊ शकली नाही. त्यानंतर मी आणि प्रफुल पटेल व अजितदादा पवार यांनी राजभवनावर जाऊन निवडणूका सोबत लढणार नसू तर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्यामुळे सत्तेला चिकटून राहण्याला अर्थ नव्हता म्हणून सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय शिर्षस्थ नेतृत्वाकडे चर्चा करून घेतला होता. आज कॉंग्रेस राज्यात चौथ्या क्रमांकावर गेली त्याला कारण पृथ्वीराज चौहान आहेत असा थेट हल्लाबोलही सुनिल तटकरे यांनी केला.

अजितदादा पवार यांच्यासोबत आज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. गेले दोन – तीन दिवस हवामान खात्याने भाकीत केल्याप्रमाणे पावसाचे चिन्ह आहे. विशेष करून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र याठिकाणी रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यावर राज्यसरकारने तात्काळ पाऊले उचलली पाहिजेत अशी अजितदादांकडे विनंती केली याशिवाय ३० नोव्हेंबरपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत येथे राज्यव्यापी विचार मंथन शिबीर होत असून त्या शिबिराच्या पूर्व तयारीची संपूर्ण माहिती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा पवार यांना आज दिली अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.