…आणि सुप्रिया सुळेंनी राज्यपालांना थेट पुरावाच दिला !

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात आता त्यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केल्याने नवा पेटण्याची चिन्ह आहेत. चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही तसंच समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. ते आज औरंगाबादमध्ये मराठी भाषा गौरव दिवस आणि श्री दास नवमी निमित्त आयोजित केलेल्या समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना त्यांनी आपल्या भाषणामध्ये हे वक्तव्य केलं.

आज मराठी भाषा गौरव दिवस आहे, यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. राम मंदिर कार्यक्रम सुरू असताना मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते वेळोवेळी देशात संतांचे कार्य दिसले आहे. शक्तीची सर्वत्र पूजा होते, माजी आमदार, खासदारांना कोणी विचारत नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

तसंच शक्ती सर्वकाही आहे, त्यामुळे शक्तीची आराधना केली जाते आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरु मिळाला तो यशस्वी होतो, जसं चाणक्य नसते तर चंद्रगुप्त नसते तसंच जर समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यपालांच्या या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याचे चिन्ह आहेत.

राज्यपालांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता संताप व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांचे विधान खोडून काढले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार… ‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’ असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.