‘फुसक्या बारची फॅक्टरी घरातच असल्यामुळे सुप्रिया सुळेंना सगळे सारखेच वाटतात’

मुंबई : भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापराबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसरं काहीच बोलायला मार्ग नाही म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आजकाल महाराष्ट्रात कागद नाही तर पेनड्राईव्ह दाखवला जातो. मात्र पहिल्या दोन आठवड्यातले पेन ड्राईव्ह बॉम्ब हे फारच फुसके निघाले, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळेंना जोरदार टोला लगावला आहे. ‘खासदार सुप्रिया सुळे यांना फुसके बार म्हणण्याची सवय असणारच कारण पवार साहेबांचं इतक्या वर्षाचे राजकारण फुसकचं निघालं. फुसक्या बारची फॅक्टरी घरातच असल्यामुळे त्यांना सगळे सारखेच वाटतात.’ असं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, महागाईसारखे अत्यंत गंभीर विषय आज देशासमोर आहेत. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या विषयावरून लोकांचे लक्ष भरकटवले जात असल्याचे सुप्रियाताई म्हणाल्या. आधी कोविडमुळे तसेच आता रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे व्यावसायिकांना आपल्या मालाची निर्यात करताना फार अडचण होत आहे. मात्र केंद्र सरकारकडून यावर मार्ग काढण्याऐवजी सूडाचं राजकारण सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.