राज्यातील सत्ता गेल्याचा धक्का सुप्रिया ताई अजून पचवू शकलेल्या नाहीत – म्हस्के 

मुंबई : राज्यातील सत्ता गेल्याचा धक्का सुप्रिया ताई अजून पचवू शकलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीसुध्दा कमी झालेली दिसतेय. त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना एखादे टॉनिक आम्ही लवकरच पाठवू असं प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) याना दिले आहे. गेल्या दीड दोन महिन्यात महाराष्ट्राची प्रचंड बदनामी झाली असे वक्तव्य करणाऱ्या सुप्रिया सुळे यांचा म्हस्के यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे.

राज्याचा गृहमंत्री भष्टाचाराच्या आरोपाखाली गजाआड गेला, मोस्ट वॉन्टेड गुंड दाऊद इब्राहीमशी (Dawood Ibrahim) लागेबांधे असल्याच्या मुद्यावरुन एका मंत्र्याच्या हातात बेड्या पडल्या. आजही ही मंडळी तुरुंगातच आहेत. त्यांच्या काळ्या धंद्यांनी महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली नव्हती का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

राज्यात जेव्हा सिंचन घोटाळा (Irrigation Scam) उघडकीस आला तेव्हा महाराष्ट्र बदनाम झाला नव्हता का ? आदर्श घोटाळ्यात एका मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला तेव्हा राज्य बदनाम झाले नव्हते का ? बॉम्बस्फोटामध्ये असंख्य मुंबईकरांनी प्राण गमावल्यानंतर बड़े देशोमें ऐसी छोटी मोटी बाते होती है|असे म्हणून जखमांवर मिठ चोळणाऱ्या माजी गृहमंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली नव्हती का?. राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमशी लागेबांधे असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी तेजीत होती. तेव्हा महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली नव्हती का? असा सवाल त्यांनी खासदार सुप्रिया सुळे याना विचारला आहे.