हे टीम देवेंद्र यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेले सुनियोजित षडयंत्र; पुणे बंदमधून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

पुणे- महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत बेताल वक्तव्ये करणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात आज पुण्यात बंदची (Pune Band) हाक पुकारली गेली आहे. पुणे शहर आज कडकडीत बंद राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आप व इतर सामाजिक संघटनांकडून मुक मोर्चाही (Silent March In Pune) काढण्यात आला आहे. या मुक मोर्चाला हजारोंच्या संख्येत स्त्रियांनी हजेरी लावली. अगदी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही उपस्थिती दर्शवली.

मुक मोर्चादरम्यान सातत्याने महापुरुषांचा होत असलेला अपमान सहन केला जाणार नाही. लवकरात लवकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकार थांबवावा, असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले आहे.

एबीपी माझाशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्मातील मुले-बाळे, स्त्री आणि पुरुष या मोर्चात सहभागी झाले होऊन त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. ती भावना ही आहे की, जर ठरवून महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान होत असेल. आणि एकदा नव्हे तर ही कृती सातत्यापूर्ण होत असेल. विशेषत: भाजपाच्याच नेत्यांकडून होत असेल; तर मला वाटतं की, हे टीम देवेंद्र यांच्या अधिपत्याखाली चालू असलेले सुनियोजित षडयंत्र आहे. या षडयंत्राला कधीतरी खीळ बसली पाहिजे, असे स्पष्ट वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले आहे.

आम्ही देवेंद्र फडणवीसांना लक्षात आणून देऊ इच्छितो की, साहेब आपण केवळ एका पक्षाचे उपमुख्यमंत्री नाहीत. तर संपूर्ण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात. संपूर्ण महाराष्ट्राचा आपण विचार करावा आणि काय तो निर्णय घ्यावा, असेही सुषमा अंधारेंनी शेवटी म्हटले.

आता यावर भाजपा आणि देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.